स्वातंत्र्य का नासले?

स्वातंत्र्य का नासले?

भारताला कुणी ग्रासले?
सांग स्वातंत्र्य का नासले?

विंचवाच्या विषा सारखे
बोलणे का तुझे भासले?

पिंड माझा पळपुटा नव्हे
मस्तकाला निवे घासले

प्रश्न साधाच मी मांडता
सर्व ज्ञानी मला त्रासले

मार्ग माझाच मी चाललो
तोंड त्याने जरी वासले

त्यागले काल जे तेच तू
‘अभय’ का आज जोपासले

                      – गंगाधर मुटे
——————————

पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

.
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते
.
.
घमासान आधी महायुद्ध होते
पुढे माणसांचे यशू-बुद्ध होते

प्रणयवासनेला सिमा ना वयाची
न तो वृद्ध होतो, न ती वृद्ध होते

जुने देत जावे, नवे घेत यावे
दिल्याघेतल्याने मती शुद्ध होते

किती साचुदे गाळ-कचरा तळाशी
तरी धार नाहीच अवरुद्ध होते

जसा बाज गझलेस येतो मराठी
तशी मायबोलीच समृद्ध होते

कशाला ‘अभय’ काल गेलास तेथे
जिथे वागणे आणखी क्रुद्ध होते

                          – गंगाधर मुटे
———————————

कापला रेशमाच्या सुताने गळा

.
.

——————————————————–
कशी देऊ दाद मित्रा, तुझा विकासाचा आलेख वेगळा
ऐश्वर्य तुझे सात मजली, अन तुला गालिच्यांचा लळा
आरसी – ओसी मध्ये तुझी करंगळी खेळते……. पण;
त्या तिथे गावी बापास तुझ्या मिळ कोरडा जोंधळा
———————————————————

.
.
कापला रेशमाच्या सुताने गळा
.

जाणवू ना दिल्या वेदना ना कळा
कापला रेशमाच्या सुताने गळा

घेतला आळ नाही निसर्गावरी
भोगुनी सोसले मी तडाखे-झळा

साथ नाही सुखाचा खरे हे जरी
का तुझ्या वाचुनी मी लुळापांगळा?

राहतो मी कुठे, नेमका कोण मी?
सापडेना खुणा, मी कसा बावळा?

भाग ओसाड का घाम गळतो जिथे?
वाट चुकलाय पैसा-टका आंधळा

झेप घेण्यास तू वेळ लावू नये
मांडला आज आहे इथे सापळा

रंग खात्रीस पक्का, फिका ना पडे
वर्ण भाग्यात माझ्या निळासावळा

मार्ग सारेच धुंडाळतो कैकदा
चालण्याला तरी शोधतो वेगळा

चित्त शाबूत असणे ”अभय” चांगले
पोळलेला जरी भावनांचा मळा

                               – गंगाधर मुटे

—————————————
अवांतर – एक विडंबन
मै खंजर तो नही
मगर ये घोरफडी
जबसे मैने तुझको काटा
खंजरी हो गयी….॥
—————————————

जगणे सुरात आले

जगणे सुरात आले

वृत्तात चालण्याचे शब्दास ज्ञान झाले
कविते तुझ्या लयीने जगणे सुरात आले

आनंद भोगताना परमार्थ साध्य व्हावा
“असलेच कार्य कर तू” दोहे मला म्हणाले

चिरडू नये कधीही हकनाक जीवजंतू
हे सार वर्तनाचे, भजनातुनी मिळाले

दुखवू नये कधीही मनभावना कुणाची
सुविचार मर्म हेची, ओव्यातुनी निघाले

पद्यात काय गोडी, शब्दात काय सांगू
ठाऊक फक्त त्यांना, गाण्यात जे बुडाले

मतला, रदीफ, यमके, शब्दात गुंफताना
झालेत ते यशस्वी, उत्तुंग जे उडाले

का पाठलाग त्यांचा, निष्कारणे करावा?
एकेकटेच मिसरे, निसटून जे पळाले

कसला ‘अभय’ कवी तू? रचलेस हे मनोरे
जे ना तुला कळाले! जे ना मला कळाले!

                                          – गंगाधर मुटे
——————————————–

सुप्तनाते

.
सुप्तनाते
.
तुझे आणि माझे मुळी सख्य नाही, तरी ओढ का वाटते या मना
कुणी निर्मिले हे असे सुप्तनाते, जरा तू खुलासा मला सांगना

तुला मान्य नाहीच अस्तित्व माझे, हिशेबी तुझ्या मी किडामाकुडा
तुझे वागणे तूज लखलाभ मित्रा, तुला मोक्ष देवो अहंभावना

तुला जाण नाही, मला भान नाही, भटकलाय संसारगाडा कुठे?
धुरा ताणलेले जसे बैल दोन्ही, कुणीही कुणाला जुमानेचना

चला वापरा एकदा आणि फेका, हवी ती खरेदी नव्याने करा
इथे काळिजेही दिखाऊ-विकाऊ, हृदय भासते ‘मेड इन चायना’

किती ग्रंथ वाचून मुखपाठ केले, किती ऐकतो रोज पारायणे
जुमानेच नाही कशालाच थोडी, नियंत्रीत होईचना वासना

कसा आज रस्ता दिशाभूल झालो, निघालो कुठे अन् कुठे पोचलो
कसोटीत उद्दिष्ट हरवून गेले, “अभय” व्यर्थ गेली तुझी साधना

                                                               – गंगाधर मुटे
——————————————————————–

क्षण एक पुरे जगण्यास खरा

.
.

क्षण एक पुरे जगण्यास खरा

जगणे कसले शतवर्ष नरा?
क्षण एक पुरे जगण्यास खरा

लपवून व्यथा रडतोय मनी
दिसतोच सदा मुखडा हसरा

जगणेच नको असले तसले
परसात पडून जणू कचरा

मरणास इथे नच घाबरतो
असते जगणेच कठीण जरा

श्रमतो, दमतो, शिणतो पुरता
परिहार जणू जुळता नजरा

दिसतात इथे जन सज्जन हे
अपुलाच स्वभाव नसेल बरा

रुळताच मनी भलतेसलते
पुसतात कशास हवा नवरा

वरदान मिळो “अभया”त जगा
दररोज घरात जणू दसरा

                           – गंगाधर मुटे
———————————-
पुण्यनगरी दीपावली विशेषांक २०११

पुण्यनगरी
प्रकाशित गझल
———————————-
वृत्त : तोटक    रदीफ : गैरमुरद्दफ
———————————-

हात घसरतो आहे


हात घसरतो आहे

अल्याड डोंगर पल्याड खाई, डचमळतो मी मधात आहे
रुतेचना ही नखे कुठेही, सदा घसरतोच हात आहे

कुटाळकीच्या समोर सज्जन समाज सारा हरून गेला
तसाच मीही क्रमाक्रमाने सदैव खातोच मात आहे

बरेच काही लिहून गेलो, कुठे दखल घेतलीय माझी?
जरी तयांनी जरा खरडले, तुफान चर्चा जगात आहे

खुशाल करती टवाळखोरी बघून कोणास पाठमोरा
समोर येता मुखावरी मुख हसून हॅलो प्रघात आहे

किती शहाणे, किती दयाळू, घडीव आहेत राज्यकर्ते
विरोधकांनो बघा जरासे हवेवरी का जकात आहे?

’अभय’ पुन्हा तू नकोच देऊ, तुझे असूदे तुझेच पाशी
मुळीच नाही गरज कुणाला समस्तजन हे सुखात आहे

                                          – गंगाधर मुटे
——————————————————–
                    पूर्वप्रकाशित गझल
                
            मायबोली-हितगुज दिवाळी अंक २०११

——————————————————–

ते शिंकले तरीही


ते शिंकले तरीही…..!

आकांत बेदखल का अमुचे जगात होते?
ते शिंकले तरीही चर्चा नभात होते

सोकावलाय येथे काळोख माजलेला
घनघोर रात्र कोठे, कोठे प्रभात होते

का लोळतात पायी सिंहासने तयांच्या?
अद्भुत नवल कसले, त्यांच्या कुळात होते?

आक्रोश शोषितांचे ना उग्र रूप घेते
आक्रंदणे तयांची घरट्यात आत होते

जुळली सतार नव्हती बेसूर जीवनाशी
कसली स्मशानयात्रा तालासुरात होते?

दारिद्र्य पोसताना, गरिबीस राखताना
वाट्यात तज्ज्ञ अभये का एकजात होते?

                                      – गंगाधर मुटे
————————————————
                 पूर्वप्रकाशित गझल
             
                     मोगरा फ़ुलला
                 ई दीपावली अंक २०११
————————————————

बत्तीस तारखेला

बत्तीस तारखेला

भलत्याच ऐनवेळी, हटकून तोल गेला
नादान सद्गुणांनी अवसानघात केला

जागून रात्र सारी, उपयोग काय झाला?
सावज रणात येता, कुत्रा पळून गेला

सांगू नकोस भलते सलतेच तू बहाणे
उरलाय शब्द केवळ, का ओल आटलेला?

नेमून लक्ष्य केले साधेपणास माझ्या
झालीय तीच राणी, माझा गुलाम केला

समजायला हवे ते, समजून आज आले
काही इलाज नाही, पोटातल्या भुकेला

लोंढेच घोषणांचे दिल्लीवरून आले
येणार वित्त आहे, बत्तीस तारखेला

त्याचे रडून झाले, रडतोय मी अजूनी
हिसकून का बरे मग, माझा रुमाल नेला?

राज्यात भेकडांच्या, जनतेस अभय नाही
सोकावलाय मृत्यू तो रक्त चाखलेला

                                     – गंगाधर मुटे
——————————————

माझी ललाटरेषा

माझी ललाटरेषा

धुंदीत वैभवाच्या, मस्तीत चूर झाली
माझी ललाटरेषा, मजला फितूर झाली

तब्बेत माणसाची, आहे जटील कोडे
जी काल भ्याड होती, ती आज शूर झाली

ते वीर स्वाभिमानी, जे झुंजले रणाला
औलाद आज त्यांची, का “जी हुजूर” झाली?

घे घट्ट आवळूनी, करपाश रेशमाचे
भासे असे जसे की, दमछाक दूर झाली

घे हा ‘अभय’ पुरावा, त्यांच्या परिश्रमाचा
ती माणसेच होती, जी कोहिनूर झाली

                                – गंगाधर मुटे
——————————​——–

मी मराठी – स्पर्धा विजेती गझल

कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू?


किती ज्येष्ठ आहे, किती श्रेष्ठ आहे, किती सभ्य आहेत ही माणसे
परी माणसासारखी वागताहे, असे चित्र नाही दिसे फारसे

कधी भाट होई सख्या चेहर्‍यांची, कधी घोटती लाळ द्रव्यापुढे
खरे रूप दावी असे धैर्य नाही, किती भ्रष्ट झालेत हे आरसे?

“घराणे” उभे राहिले गावगावी, कुठे लोकशाहीस नेतो अम्ही?
सग्यासोयर्‍यांचे अता राज्य आले, पदे भोगण्याला नवी वारसे

जरा गंध नाही मुळी झोपडीला, नव्या इंडियाच्या युगाचा नव्या
कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू, मिटवले कुणी पावलांचे ठसे?

कुणी एक वेडा म्हणे जागवावी, अभय झोपलेली इथे माणसे
परी घेतले सोंग ज्याने निजेचे, कळेना तया जागवावे कसे…!

                                                                               गंगाधर मुटे
—————————————————————————-
कविता/गझल                                                    वृत्त – सुमंदारमाला
लगावली – लगागा लगागा लगागा लगागा, लगागा लगागा लगागा लगा
—————————————————————————-

                   १ एप्रिल २०११ ते १५ मे २०११ या कालावधीत मी मराठी.नेट (http://www.mimarathi.net) ने कविता स्पर्धा २०११ ही स्पर्धा आयोजित केली होती. या स्पर्धेमध्ये तब्बल १५७ स्पर्धकांनी प्रवेशिका भाग घेतला होता.
                  या स्पर्धेचा दि. १० सप्टेंबर २०११ रोजी निकाल जाहीर झाला असून या स्पर्धेत माझी वरील कुठे लुप्त झाले फुले-भीम-बापू? ही  कविता प्रथम क्रमांक विजेता ठरली होती.
             दुरवर ग्रामीण भागात अडगळीत पडलेल्या माझ्यासारख्या  एका शेतकरी माणसाची कविता पुरस्कृत करून माझ्यामध्ये या स्पर्धेने एक नवा आत्मविश्वास जागविला आहे.
             त्याबद्दल  माझ्या कवितेला व्यासपीठ उपलब्ध करून देणार्‍या या आंतरजालीय विश्वाच्या निर्मात्याला, संधी उपलब्ध करून दिल्याबद्दल मी मराठीचे मालक या नात्याने राज जैन यांना,  ज्येष्ठ पत्रकार-लेखक-गझलकार असलेले परीक्षक श्री प्रदीप निफाडकर यांना,  तसेच
            माझ्या कवितेला फुलविण्यात मोलाचा हातभार लावणार्‍या तमाम आंतरजालावरील प्रतिसादकांना
मी मन:पूर्वक अभिवादन करतो. 🙂
                                                                                                                         – गंगाधर मुटे

——————————————————————————————————————————

स्वप्नरंजन फार झाले


स्वप्नरंजन फार झाले

स्वप्नरंजन फार झाले
सौख्यही बेजार झाले

झोपलेले ते निखारे
जाग येता गार झाले

झुंजण्याची वेळ येता
शौर्य-धैर्य बिमार झाले

झुंजणारे वीर खंदे
आरशांचे हार झाले

खेळ येथे माकडांचे
या भुईला भार झाले

पान कोरे अक्षरांना
सांगते आचार झाले

बांधलेली भोवताली
भिंत होती दार झाले

उत्तरांना पेलताना
प्रश्नकोडे ठार झाले

“अभय”तेच्या ’त्या’ नशेचे
बंद सारे बार झाले

                                   गंगाधर मुटे
……………………………….…
वृत्त : मनोरमा
लगावली : गालगागा गालगागा
…………………………………

अस्तित्व दान केले

अस्तित्व दान केले – लोकमत दिवाळी अंक २०११

असणेच आज माझे, नसण्यासमान केले
माझ्याच सावलीने अस्तित्व दान केले

मस्तीत टाकलेल्या, एकाच पावलाने
पावित्र्य आज माझे, दोलायमान केले

हळवा नकोस होऊ, अश्रू मला म्हणाले
संतप्त हुंदक्यांनी, माझे निदान केले

चंचूप्रवेश ज्यांचा हळुवार पावलांनी
त्या शुभ्र कावळ्यांनी उद्ध्वस्त रान केले

वाचाळ वल्गनांना वैतागलो पुरेसा
कानास वेधणारे, रस्ते किमान केले

इवल्या जगात माझ्या, मी रांगतो अजूनी
निष्कपट भावनेला दैदिप्यमान केले

जळले न रोज जेव्हा, चुल्ह्यातले निखारे
तेव्हा “अभय” भुकेला, धारिष्ट्यवान केले

                                        – गंगाधर मुटे
————————————————

              लोकमत दिवाळी विशेषांक
              
             मध्ये प्रकाशीत कविता/ गझल
————————————————

वादळाची जात अण्णा

वादळाची जात अण्णा

माणसे खंबीरतेने, टाकतेया कात अण्णा
इंडियाला भावला हा, एक झंझावात अण्णा

धर्म सत्तेचा कळेना, का असा सोकावलेला?
भ्रष्ट नेते मोकळे अन, कोठडीच्या आत अण्णा

भ्रष्ट आचारास सत्ता, मुख्य झाला स्रोत आहे
घाव घाला केंद्रस्थानी, एकदा द्या मात अण्णा

एक आशेचा उमाळा, शोधताहे देशवासी
चेतना चिंतामणीची, भासते बरसात अण्णा

आस अण्णा श्वास अण्णा, अभयतेचा ध्यास अण्णा
अग्निलाही पोळणार्‍या, वादळाची जात अण्णा

                                                        – गंगाधर मुटे
—————————————————————————————————–

Anna Hajare
Anna Hajare

Anna Hajare

—————————————————————————————–

राखेमधे लोळतो मी (हजल)

राखेमधे लोळतो मी (हजल)

मलिंदा मिळावा असे भाकतो मी
जगावेगळे मागणे मागतो मी

कशाला गडे रोज येतेस स्वप्नी?
असा काय आमिर तुला वाटतो मी?

जसे गुंग व्हावे नशीले पिताना
तुला पाहताना तसा झिंगतो मी

मला नेमक्या टाळती अप्सरा त्या ब
हूतेक त्यांना कवी भासतो मी!

दिलेली फुले तू जमा खूप झाली
अता गूळ, साखर, डबा शोधतो मी

करा बंद कानात आकाशवाणी
अरे मच्छरांनो बघा पेंगतो मी

समाजात चर्चेमधे राहण्याला
अभय मस्त राखेमधे लोळतो मी

                               – गंगाधर मुटे
——————————————-